भारताचा सर्वात तेजोमय आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. अंध:कारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि द्वेषावर प्रेमाचा विजय साजरा करण्याचा उत्सव. दिवाळीच्या मंगल उत्सवाची सुरुवात करणाऱ्या वसुबारस पासून ते भाऊबीज पर्यंत गोमाता आणि वासराच्या पूजनातून आपण निसर्ग, शेती आणि संस्कृतीचे पूजन करत असतो.
दिवाळीचा दीप फक्त घर उजळवत नाही, तो मनांनाही प्रकाशमान करतो. धर्म, जात, भाषा किंवा प्रदेश भेद न करता सर्वांनी मिळून साजरा करायचा हा सण आपल्याला एकतेचा खरा अर्थ शिकवतो. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि परस्पर सन्मान यामुळेच खरी दिवाळी उजळत असते.
या वर्षीची दिवाळी आपण “स्वच्छ आणि हरित” बनवूया. फटाक्यांच्या आवाजाऐवजी हास्याचा गजर करूया, प्रदूषणाऐवजी सुगंध पसरूया. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे, पर्यावरणपूरक दिवे, मातीचे दिवे आणि स्थानिक कारागिरांच्या वस्तूंना प्रोत्साहन देऊया, जेणेकरून आनंदासोबत रोजगारही उपलब्ध होईल.
दिवाळीच्या निमित्ताने आपण समाजातील दुर्बल घटकांना, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना, अनाथ मुलांना आणि गरजू कुटुंबांना आनंदाचा प्रकाश देऊ शकतो. थोडी मदत, थोडं प्रेम आणि थोडा वेळ हेच खऱ्या अर्थाने दिवाळीचे दान. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरतो, तेव्हाच खरा “प्रकाशोत्सव” साजरा होतो.
दिवाळीचा सण आपल्याला आपल्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि कुटुंबीय मूल्यांची आठवण करून देतो. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद, कुटुंबीयांसोबत साजरा केलेला आनंद आणि सामूहिक प्रार्थना हेच आपल्या भारतीयत्वाचं सार आहे. आधुनिकतेसोबत आपल्या संस्कृतीची मुळे जपली पाहिजेत, कारण संस्कृती हीच आपल्या समाजाची खरी ताकद आहे.
या दीपोत्सवाच्या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांततेचा दिवा कायम प्रज्वलित राहो !
Leave Your Comment